पुणे : सफाई सेवकांवर मोठी जबाबदारी

पालिकेचा निर्णय; कर आकारणी न झालेल्या मिळकती शोधणार

पुणे – शहरातील कर आकारणी न झालेल्या मिळकतींची शोधमोहीम आता महापालिकेच्या सफाई सेवकांच्या माध्यमातून हाती घेतली जाणार आहे. हे सेवक प्रत्येक मिळकतीच्या ठिकाणी जाऊन कर आकारणी झाली का नाही, याची माहिती घेण्यासह, कर आकारणी झालेली असल्यास संबंधितांकडून बिलाची प्रतही घेतील, तर आकारणी झाली नसल्यास त्याची यादी करून मिळकतकर विभागास देणार आहेत. कर आकारणी न झालेल्या जास्तीत जास्त मिळकती शोधून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेकडून शहरात दरवर्षी नवीन मिळकती नोंदणीसाठी विशेष मोहीम घेतली जाते. मात्र, शहरात अनेक बांधकामांचा पूर्णत्वाचा दाखला न घेताच वापर सुरू झालेला आहे, असे अनेक मिळकतधारक नोंदणी न करताच मिळकती वापरतात. परिणामी, महापालिकेस कोट्यवधीच्या महसुलावर पाणी सोडावे लागते.

महापालिकेकडून जीआयएस सर्वेक्षणाद्वारेही शहरातील मिळकतकर नोंदणी न झालेल्या मिळकती शोधण्यात येत आहेत. मात्र, त्याचाही फारसा परिणाम होत नसल्याने आता पालिकेने स्वत:च्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अशा मिळकती शोधण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे कार्यरत असलेल्या सफाई सेवकांची मदत घेतली जाणार आहे. हे सफाई सेवक दररोज शहर स्वच्छतेच्या निमित्ताने शहरात फिरत असल्याने त्यांना मिळकतींची माहिती असते. त्यामुळे नव्याने वापरात येणाऱ्या मिळकतींचे सर्वेक्षण करण्यास संबंधित मिळकतीला कर आकारणी झालेली आहे किंवा नाही तसेच झालेली असल्यास कराच्या बिलाची पावती हे कर्मचारी सर्वेक्षणात संकलित करणार आहेत.

1500 कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट…
महापालिकेने नोव्हेंबर महिन्यातच यंदा एक हजार कोटींचा मिळकतकर वसूल केला आहे. करोना नंतर जवळपास आठ महिन्यांनी शहर पुन्हा अनलॉक झाले असल्याने आर्थिक गाडा पुन्हा रूळावर आला आहे. त्यामुळे, पुढील चार महिन्यात प्रशासनाने आणखी 500 कोटींचे उत्पन्न वाढवून यंदाच्या वर्षी मिळकतकर विभागाचे उत्पन्न 1500 कोटींपर्यंत वसूल करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी, सध्या सुरू असलेली अभय योजना संपताच, या थकबाकीदारांच्या मिळकतींची जप्ती केली जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.