कोरोनावरील लसीची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारचे खास अॅप तयार

नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी जगात लस निर्मितीचे अतोनात प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातच लस उत्पादक कंपनी भारत बायोटेकने कोव्हिड – 19 वर मात करणाऱ्या भारतातील पहिल्या देशी लसीची म्हणजेच ‘कोव्हॅक्सिन’ची तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू केली असल्याची घोषणा केली. फेज-3 चाचणीमध्ये संपूर्ण भारतातील 26,000 स्वयंसेवकांचा समावेश असणार आहे. दरम्यान, कोरोनावरील लसीबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारत सरकारने एक खास अॅप तयार केलं आहे.

कोव्हिन असे या अ‍ॅपचे नाव आहे. हे अ‍ॅप तुम्हाला कोरोना लसीचा साठा, त्याचे वितरण, स्टोरेज याबाबतची माहिती देईल. ही लस जेव्हा दिली जाईल, तेव्हा त्याचे वेळापत्रकही कोव्हिन अ‍ॅपवर उपलब्ध होईल. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्याला देशभरातील 28 हजार स्टोरेज सेंटरमधील लसींच्या साठ्याविषयची माहिती मिळणार आहे.

कोरोना व्हॅक्सिनचा साठा करुन ठेवलेल्या जागेवरील तापमानावरही कोव्हिन अॅपचे लक्ष असणार आहे. या अॅपद्वारे साठा करुन ठेवलेल्या जागेवरील तापमानात होणाऱ्या बदलांबाबतची माहिती मिळेल. दरम्यान, तुम्हाला लस कधी दिली जाणार आहे, याबाबतची माहितीदेखील या अ‍ॅपद्वारे नागरिकांना मिळेल. तसेच तुम्हाला लस दिल्यानंतर त्याचे प्रमाणपत्रदेखील या अ‍ॅपद्वारे तुम्हाला दिले जाणार. तुम्हाला लस दिल्यानंतर आपोआप या अॅपमध्ये संबंधित प्रमाणपत्र जनरेट होणार आहे. दरम्यान,दिवाळीनंतर देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.