पुणे – भोगीसाठी लागणाऱ्या भाज्या खरेदीसाठी शनिवारी (दि.१३) बाजारात गर्दी झाली होती. भाज्यांना मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात भावात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली. भोगी रविवारी (१४ जानेवारी) आहे. भोगीसाठी गृहिणींकडून वाल पापडी, पापडी, मटार, वांगी, पावटा, गाजर या भाज्यांना मागणी असते. भाज्यांना मागणी चांगली असून मागणी वाढल्याने भावात वाढ झाल्याची माहिती किरकोळ बाजारातील भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी दिली.
किरकोळ बाजारात पावशेर भाजीचे भाव ३० ते ४० रुपये दरम्यान आहेत. शनिवारी मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी बाजाराचे कामकाज बंद असते. त्यामुळे किरकोळ बाजारातील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी भाज्यांची खरेदी केली. मागणी वाढल्याने भाज्या कडाडल्या, असे त्यांनी सांगितले. भोगीसाठी लागणाऱ्या भाज्यांच्या खरेदीसाठी मध्यभागातील महात्मा फुले मंडई, नेहरु चौक, गोविंद हलवाई चौक परिसरात भाजीपाला गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. संक्रांतीनिमित्त पूजनासाठी लागणारे साहित्य तसेच तिळगुळाला चांगली मागणी आहे. पूजा साहित्य खरेदीसाठी मंडई, शनिपार परिसरात गृहिणींनी गर्दी केली होती.
“भोगीनिमित्त गृहिणी मिश्र भाजी तयार करतात. भोगीला भाज्यांना चांगले भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला राखून ठेवला होता. किरकोळ बाजारात पावशेर भाजीचे भाव ३० ते ४० रुपये पावशेर आहेत.” – प्रकाश ढमढेरे, भाजीपाला व्यापारी, किरकोळ बाजार
भाज्यांचे किलो आणि जुडीचे भाव
हरभरा गड्डी- २५ ते ३० रुपये एक जुडी
वालपापडी- १२० ते १४० रुपये
पापडी- १२० ते १४० रुपये
वांगी- १२० ते १४० रुपये
पावटा- १२० ते १४० रुपये
भुईमूग शेंग – १६० ते २०० रुपये
मटार- ८० ते १०० रुपये
गाजर- ५० ते ६० रुपये