पुणे, दि. 27 -दहशतवाद विरोध पथकानेही (एटीएस) गुरुवारी धडक कारवाई करत कोंढव्यातून अब्दुल कादीर पठाण (रा.तालाब मस्जिद, कोंढवा) याला अटक केली आहे. त्यांने कोथरूडमधून पकडण्यात आलेल्या दोघा दहशतवाद्यांना आश्रय देण्याबरोबरच आर्थिक सहाय्य केल्याचेही उघड झाले आहे. यामुळे हा “टेरर फंडिंग’चा प्रकार असल्याचा संशय “एटीएस’कडून व्यक्त करण्यात येत आहे.
कोथरूड पोलिसांनी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (वय 24) आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी (वय 23 रा. दोघेही रा. मिठानगर, कोंढवा, मूळ रा. हरमाला कुलकुंडी, रतलाम, मध्य प्रदेश) यांना यापूर्वीच दि. 18 जुलैला रात्री उशिरा अटक केली
होती. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार महम्मद शहनवाज आलम (वय 31) पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. दोघेही आरोपी एनआयएने वॉंटेड घोषित केलेले आहेत. त्यांच्यावर प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस होते. पावडर स्फोटक असल्याचे एक्सप्लोसिव्ह वेपर डिटेक्टरमधून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, दोघांच्या घरझडतीत महत्त्वाची दहशतवादासंदर्भातील माहिती मिळाली होती. घराचा मालक अन्सारअली इद्रीस याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते, त्याच्या चौकशीत त्याने अब्दुल पठाण याला घर भाड्याने दिल्याचे सांगितले होते. चौकशीत अब्दुल पठाण याने इद्रीस यांच्या परस्पर खान आणि साकी यांना पोटभाडेकरू म्हणून ठेवल्याचे पुढे आले आहे. या दोघांना पोटभाडेकरू ठेवून स्वत: मात्र दुसरीकडे राहात होता.
अब्दुल पठाण याने मागील दीड वर्षे खान आणि साकी यांना आश्रय दिला होता. इतकेच नव्हे तर त्यांच्या चरितार्थासाठी स्वत:च्या ग्राफिक डिझाइनच्या व्यवसायात त्यांना काम दिले होते. तो त्यांना प्रत्येकी आठ हजार महिना पगार देत होता. त्या दोघांना मात्र ग्राफिक डिझाइनचे कोणतेही ज्ञान नाही. यामुळे पठाण याने दोघांना आश्रय देण्याबरोबरच आर्थिक मदत केल्याचेही स्पष्ट होते. हा “टेरर फंडिंग’चा प्रकार असून पठाण याने त्या दोघांना देण्यासाठी कोणती संघटना किंवा संस्थेकडून पैसे घेत होता का? याचा तपास करायचा असल्याचे एटीएसने गुरुवारी न्यायालयात सांगितले.
मस्जिदमध्ये झाली आरोपींची भेट…
आरोपी रमजानच्या महिन्यात कोंढव्यात आले. तेथे ते एका मस्जिदीमध्ये चार दिवस राहिले. यानंतर त्यांनी तेथे आलेल्या पठाण याच्याशी संपर्क साधून काम आणि राहण्याच्या जागेसंदर्भात विचारणा केली. यानंतर पठाण याने स्वत:ची राहती भाड्याची सदनिका दोघांना देऊन स्वत: एका खोलीत राहण्यास निघून गेला. त्या दोघांना स्वत:च्या व्यवसायात कामाला ठेवून दरमहा पैसे देऊ लागला. हा सर्वच प्रकार संशयास्पद असून पठाण हाही स्लीपर सेलचाच एक भाग आहे का? याची तपासणी केली जात आहे.