पुणे -“मराठी’साठी मानसेवी शिक्षकांच्या होणार नियुक्‍त्या

पुणे – मराठी भाषा फाऊंडेशन योजनेअंतर्गत चालू शैक्षणिक वर्षात इंग्रजी माध्यम वगळून अमराठी शासनमान्य शाळांमध्ये मानसेवी तत्वावर शिक्षकांच्या नियुक्‍त्या करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या निरंतर शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल करण्यासाठी दि.24 जूनपर्यंत शाळांना मुदत देण्यात आली आहे.

मानसेवी शिक्षकांच्या नियुक्तीसाठी पदवी, पदव्युत्तर पदवी व व्यावसायिक अर्हता बी.एड., एम.एड अशी राहणार आहे. कोणत्याही एकास्तरावर मराठी भाषा हा विषय आवश्‍यक असल्याची पूर्वीची अट आता शिथिल करण्यात आली आहे. इयत्ता आठवी ते दहावीच्या तीनही वर्ग मिळून अल्यसंख्यांक विद्यार्थ्यांच्या 1 ते 180 संख्येपर्यंत एक मानसेवी शिक्षक, 181 ते 300 पर्यंत दोन मानसेवी शिक्षक तर त्यापुढे प्रत्येक 150 विद्यार्थ्यांसाठी एक याप्रमाणे शिक्षकांची मान्य संख्या निर्धारित करण्यात आली आहे.

या शिक्षकांना जुलै ते मार्च या एकूण 9 महिन्यांसाठी प्रत्येकी दरमहा पाच हजार रुपये प्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. या योजनाचे वर्ग शाळेच्या वेळेव्यतिरिक्त शाळा सुरू होण्यापूर्वी किंवा शाळा सुटल्यानंतर आयोजन करावे लागणार आहे. वर्गनिहाय व मानसेवी शिक्षक निहाय वर्गाचे वेळापत्रक, विद्यार्थ्यांचे स्वतंत्र उपस्थितीपत्रक, शिक्षक उपस्थितीपत्रक, शिक्षक टाचण व नियोजन वही, मुख्याध्यापकांनी वर्ग निरीक्षण करुन अहवाल नोंदविलेले लॉगबुक आदी अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्‍यक आहे., असे जिल्हा परिषदेच्या निरंतर शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी हरुन अत्तार यांनी स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.