पुणे – पावसाळ्यापूर्वी पीएमपीच्या 1,100 बसेसची दुरुस्ती पूर्ण

पुणे – शहराची मुख्य सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या पीएमपीची अवस्था पावसाळ्यामध्ये अतिशय बिकट होते. मात्र, यंदा पीएमपी प्रशासनाने सुमारे 1,100 बसेसची दुरुस्ती पूर्ण झाली असल्याची माहिती दिली.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सुमारे 2 हजारांच्या आसपास बस आहेत. त्यापैकी स्वत:च्या मालकीच्या 1,362 बसेस आणि कंत्राटी मालकीच्या 602 बसेस आहेत. या ताफ्यातील पाचशेपेक्षा जास्त बसेसचे आयुर्मान संपले आहे. त्याचबरोबर अनेक बसेस छत गळत असल्याने प्रवाशांना बसमध्ये देखील नाहक त्रास सहन करावा लागतो.

बसेसची दुरावस्था लक्षात घेता मे महिन्यात प्रत्येक डेपोला परिपत्रक काढून बसची डागडुजी करण्याची आदेश दिले होते. या आदेशांनुसार कामे करण्यात येत असल्याचे पीएमपीकडून नमूद करण्यात आले.

पावसाळ्यात प्रवाशांना त्रास होऊ नये, याकरिता बसेसची पावसाळापूर्व देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी सुमारे 1,100 बसची देखभाल दुरूस्ती पूर्ण झाली असल्याची माहिती पीएमपीएमएल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, यंदातरी बसेसमुळे तारांबळ उडू नये, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.