कात्रज (प्रतिनिधी) – कात्रज मोरेबाग बसस्टॉप समोरील सातारा रस्त्यावर अचानक एका इलेक्ट्रॉनिक एसयुवी कार ने पेट घेतला. कात्रज चौक लगत असलेल्या सातारा रस्त्यावरील रिलायन्स मार्ट समोर कारच्या बोनेट मधून धूर येऊ लागला. प्रसंगावधान राखत चालक बाहेर पडले. काही क्षणात कारने पेट घेतला. या दुर्घटनेत कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कुणी जखमी झाले नाही.
सायंकाळी सहाच्या सुमारास स्वारगेट कडून कात्रजच्या दिशेने येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कारने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे यांनी अग्निशमन दलास माहिती दिली.
कात्रज अग्निशमक दल केंद्र प्रमुख संजय रामटेके, चालक शेखर येरफूले, तांडेल अमोल कर्डेकर, सचिन शिंदे व फायरमन जयवंत तळेकर, संदीप घडशी, निलेश राजीवडे आग आटोक्यात आणली. सातारा रस्त्यावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. कार पेट घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी काही काळ वाहतूक कोंडी झाली. वाहतूक विभागाने कार बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.