“सूर्यकिरण’, “सारंग’ने फिटले डोळ्यांचे पारणे
पुणे – हवेत “सूर्यकिरण’ विमानांच्या सहाय्याने साकरण्यात येणाऱ्या विविध आकृती, एकमेकांजवळून अतिशय वेगाने प्रवास करत सादर केलेल्या “सारंग’ हेलिकॉप्टर्सच्या अनोख्या कसरती आणि पॅराशुटच्या सहायाने उंचावरून उडी घेत, हवेत तरंगणारे हवाई दलाचे “एअर डेविल्स’ जवान अशा शानदार प्रदर्शनांनी हवाई दलाच्या “एअर शो’मध्ये उत्साह भरला. चित्तथरारक ठरलेल्या या “एअर शो’ला उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
भारत-पाकिस्तान यांच्यात 1971 च्या युद्धात भारतीय सैन्याने मिळविलेल्या विजयाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोहगाव विमानतळ येथे हा “एअर शो’ आयोजित करण्यात आला होता.
लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. विमानतळारील मुख्य धावपट्टी दुरुस्तीच्या कारणास्तव बंद असल्याने, “समांतर टॅक्सी ट्रॅक’ वरून उड्डाण भरत, विमानांनी विविध आकृती सादर केल्या.
प्रदर्शनात “एअर डेव्हिल्स’ नावाचे स्कायडायव्हर्सनी हवेतून उंचावरून जमिनीकडे झेप घेत, कसरती सादर केल्या. त्यानंतर “सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीम’ने त्यांच्या प्रगत लाइट हेलिकॉप्टरसह सादर केलेल्या थरारक कसरती आणि सूर्यकिरण एरोबॅटिक टीमने त्यांच्या “हॉक एमके – 152′ विमानांसह सादर केलेल्या विविध आकृतींनी प्रेक्षकांची मने जिंकली.
“सूर्यकिरण’ने साकारली “तेजस’, “सुखोई’ची आकृती
“सूर्यकिरण’ या विमान प्रदर्शन तुकडीने आपल्या विमानांसह भारतीय बनावटीच्या “तेजस’ या लढाऊ विमानाची तसेच पुण्यात तैनात असलेल्या “सुखोई’ या लढाऊ विमानाची आकृती सादर केली. त्याचबरोबर युथ, डायमंड, हृदयाकार आकृती सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.
भारत पाक यांच्यात 1971 ला झालेल्या युद्धात भारतीय लष्कराने मिळविलेल्या विजयाच्या 50 वर्षाच्या स्मरणार्थ “स्वर्णिम विजय वर्ष’ साजरे केले जात आहे.यानिमित्त शनिवारी (दि.16)ऑक्टोंबर ला लोहगाव हवाई दलाच्या तळावर एअर शो केला गेला.या प्रदर्शनात “एअर डेव्हिल्स’ नावाचे पॅराग्लॉयडर त्यानंतर सारंग या लाइट हेलिकॉप्टर डिस्प्ले टीम आणि सूर्यकिरण एरोबॅटिकद्वारे विमानाने नेत्रदिपक अशी साहसी कसरती केल्या.यावेळी हॉक एमके 152 विमानासह टीमने उपस्थित होते.
विमानांची प्रात्यक्षिके सादर करण्यासाठी प्रत्येक आकृतीचा चांगला विचार केला जातो आणि नियमित सरावही केला जातो. आम्ही सहा महिने सराव करतो आणि नंतर सहा महिने अशाप्रकारे कसरती सादर करतो. या प्रदर्शन तुकडीत सहभागी होण्यासाठी पायलटकडे 120 तासांच्या उड्डाणाचा अनुभव आवश्यक आहे.
– मनीष भल्ला, स्क्वॉड्रन लीडर, “सूर्यकिरण’ एरोबॅटिक टीम