पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यामध्ये आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार की स्वतंत्र याबाबत अद्याप निर्णय झाला नाही.
हा निर्णय स्थानिक खासदार, आमदार घेतील असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र याबाबत उत्सुकता कायम आहे.
शरद पवार पिंपरी चिंचवड शहराच्या दोनदिवसीय दौऱ्यावर आहे. त्यांनी आज शहरातील विविध विकास कामांची उद्घाटने केली. भोसरी येथील रुग्णालयातील आयसीयू विभागाचेही उद्घाटन केले. आमदार आण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी उभारण्यात आलेल्या कक्षाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर आझम पानसरे, योगेश बहल, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नाना काटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी महापालिका निवडणुकीबाबत पवार म्हणाले, महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढणार का याचा निर्णय मी एकटा घेणार नाही. त्या जिल्ह्यांमधील नेते, कार्यकारिणी याबाबतचे निर्णय घेईल. किंवा त्यामध्ये तीनही पक्षांचे नेते एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेतील.
त्यांचे ठरल्यानंतर अंतिम ते मला विचारतील त्यावेळी मी काय निर्णय द्यायचा तो देईल असे पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित की सर्व पक्ष वेगवेगळे लढणार याबाबत उत्सुकता कायम आहे.