पुणे : आघाडीचा निर्णय शहर कॉंग्रेसच्या ‘हातात’?

पुणे – राज्यातील महापालिका जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी केली आहे. दरम्यान, त्याचवेळी आघाडीबाबत स्थानिक पातळीवर आढावा घेऊन त्याचा अहवाल पाठविण्याच्या सूचना पटोले यांनी त्यांनी राज्यभरातील कॉंग्रेसच्या सर्व जिल्हा आणि शहर प्रमुखांना पत्र पाठवत दिल्या आहेत.

पटोले यांनी पाठवलेल्या पत्रानुसार पुणे शहर कॉंग्रेसने पुढील आठवड्यात पक्षाच्या सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे ठरवले आहे. त्यात आघाडी करावी का नाही, याबाबत चर्चा केली जाण्याची शक्‍यता आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी काय नियोजन असेल, याचा अहवाल पटोले यांना पाठवला जाणार आहे.

आधी झालेल्या पीएमआरडीए नियोजन समिती निवडणूक आणि त्यानंतर महापालिकेत राष्ट्रवादीने भाजपला केलेल्या मदतीवरून आघाडीत-बिघाडी झाली असली, तरी या बैठकीनंतर ही बिघाडी कायम राहणार का? असा प्रश्‍न असून, आघाडीची बंद झालेली स्थानिक पातळीवरील चर्चेची दारे पुन्हा खुली होणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

काय आहेत प्रदेशाध्यक्षांच्या सूचना
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी शहर कॉंग्रेसला पत्र पाठवले आहे. त्यात म्हटल्यानुसार, “मार्च-2022 मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांसाठी पक्षाने कुठलीही तडतोड न करता स्वबळावर लढविण्यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून आढावा घ्यावा. यासंदर्भात नियोजन करून त्याचा अहवाल प्रांताध्यक्षांना पाठवण्यात यावा. जिल्ह्यात गठीत केलेल्या बूथ कमिट्यांची सविस्तर माहितीही सादर करावी.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.