पुणे-देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या “नीट’ या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होऊन महिला उलटला, त्यानंतर अद्यापही वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झालेली नाही. “नीट’ची प्रवेशप्रक्रिया लवकर सुरू करण्याची मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत आहे.
एमबीबीएस, बीएचएमएस, बीएएमएस अशा वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश “नीट’च्या गुणांनुसार होतात. “नीट’चा निकाल सुमारे एक महिन्यापूर्वी जाहीर झाला.
आता, डिसेंबर महिना उजाडल्यानंतरही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. नीटच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे पालक चिंताग्रस्त आहेत.
नोंदणी न केल्याने विलंब
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी न केल्यामुळे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होण्यास दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत राज्य सीईटी सेलने महाविद्यालयांना सूचना केल्यानंतरही, त्यांच्याकडून वेळेत नोंदणी केली गेली नाही. त्यामुळे ही महाविद्यालये प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट झाली नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रवेशप्रक्रियेस महिनाभराचा कालावधी…
वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया साधारण महिनाभर सुरू असते. या प्रवेश प्रक्रियेत नोंदणी, गुणवत्ता यादी, ऍलॉटमेंट, प्रवेश घेणे असे विविध टप्पे असतात. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू राहिल्यानंतर, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वैद्यकीय अभ्यासक्रमांचे महाविद्यालय सुरू होण्याची चिन्हे आहेत.
वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत आमची तयारी पूर्ण झालेली आहे. मात्र, केंद्रीय स्तरावरून अजून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करता येत नाही. प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना मिळाल्यानंतर “नीट’चे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
– आर. एस. जगताप, आयुक्त, सीईटी सेल