पुणे – शहरासह राज्यात रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान सुरू आहे. त्या अंतर्गत वाहतूक नियमांच्या जनजागृतीसह वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मागील आठ दिवसांत सुमारे हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
या सप्ताहामध्ये आरटीओकडून सामाजिक संस्थाच्या मदतीने रस्ता सुरक्षेसंदर्भात विविध उपक्रम राबविले जात आहेत. नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याविषयी जागृती केली जात आहे. या माध्यमातून रस्ते अपघात कमी होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, कारवाईसाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत. प्रामुख्याने विरुद्ध दिशेने येणारी वाहने, सीट बेल्ट न लावणे, मोबाइलवर बोलणे, विमा संपणे अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.
फिटनेस प्रमाणपत्र नसलेली वाहने रडारवर
आरटीओच्या भरारी पथकांनी शहरात केलेल्या कारवाईत विना हिल्मेट १७३, विमा नसणे १०४, योग्य प्रमाणपत्र न घेणे ११६, मोबाइलचा वापर १६, नो पार्किंग ६१, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे ३३ यासह अन्य नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे देखील ही कारवाई सुरू राहणार आहे, असे पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी म्हटले आहे.