पुणे – अमली पदार्थ तस्कर ललित पाटील यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अमली पदार्थ विक्रेत्यांवर करडी नजर ठेवली आहे. पोलिसांच्या पथकाने हडपसर, लष्कर, फरासखाना, बंडगार्डन परिसरात कारवाई करून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून २५ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले.
केशवनगर-मांजरी भागात पोलिसांनी सापळा लावून शिवम शिवप्रसाद सोनुने (वय २१, घुलेनगर, वाघोली) याला पकडले. त्याच्याकडून एक लाख ६ हजारांचे मेफेड्रोन आणि मोबाइल जप्त करण्यात आला. त्याच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, गणेश पेठेत डुल्या मारुती परिसरात अरबाज रफिक बागेवाडी (वय २६, मीठानगर, कोंढवा) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ६० हजार रुपयांचे मेफेड्रोन आणि दुचाकी असा एक लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचा साथीदार अफाक अन्सार खान (रा. गणेश पेठ) याच्याविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लष्कर परिसरात करण्यात मोहंमद अल्ताफ पटेल (वय २४, महात्मा गांधी रस्ता) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक लाख ६ हजार रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, विशाल शिंदे, योगेश मोहिते, सुजीत वाडेकर, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी यांनी ही कारवाई केली.
मीरा भाईंदर येथून एकाला अटक
गुन्हे शाखेने बंडगार्डन परिसरात सापळा लावून वीरेश नगीनभाई रुपासरी (वय ५३, रा. विलेपार्ले, मुंबई, मूळ रा. सिल्व्हासा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून २१ लाख ५२ हजार किंमतीचे मेफेड्रोन, रोख साडेसहा हजार रु. वजन काटा आणि २० हजारांचा मोबाइल असा २२ लाख ३७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे करत होते.
दरम्यान, रुपासरी हा अमजद हसमत अली सय्यद उर्फ सनी उर्फ फैयज (वय-४८, सांताक्रुज इस्ट, मुंबई) याच्या मदतीने मेफेड्रोनची विक्री करत असून, तो दुबईला पळून जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत पोलिसांनी अमजदला मीरा भाईंदर येथून ताब्यात घेतले.