पुणे/सिंहगड रोड -नवले ब्रीजजवळ भरधाव ट्रकने सर्व्हिस लेनवर येत रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या सहा वाहनांना ठोकरले. यात एक पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्याधर शंकर साळुंके (68, रा. सहकारनगर) असे मृताचे नाव आहे. अमजद खान (45) हे जखमी झाले आहेत. या घटनेत दोन रिक्षा, तीन कारचे नुकसान झाले. ट्रकचालक फरार असून क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बेंगळुरू-मुंबई महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर विश्वास हॉटेलसमोर हा अपघात झाला. साताऱ्यावरून ट्रक तरकारी घेऊन दीव दमणकडे निघाला होता. गाडी नव्या कात्रज बोगद्यातून उतारावरून नवले ब्रीजजवळ येताच चालकाला डुलकी लागली.
यामुळे ट्रक थेट महामार्गावरून सर्व्हिस लेनकडे गेला. तेथे पार्क केलेल्या वाहनांना धडकून ट्रक उलटला. दरम्यान, कार पार्क करून अमजद खान व पायी चाललेल्या विद्याधर साळुंखे यांना ट्रकने ठोकरले. साळुंखेंचा मृत्यू झाला तर, खान जखमी झाले असल्याची माहिती सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी दिली.