पुणे :- दारवली सुर्वेवाडी (ता.मुळशी) येथे जमीनीच्या कारणावरून हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांच्या साथीदारांनी शेतकऱ्यास दमदाटी करून बेदम मारहाण केली. रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनाही तलावारी आणि कोयते दाखवून दहशत माजविली.
याप्रकरणी पौड पोलिसांनी दहा ते पंधरा साथीदारांवर गुन्हा दाखल केला. याबाबत प्रदिप शिवाजी बलकवडे (वय 35) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी धनजंय देसाईसह, रमेश जायभाय, शाम सावंत, रोहीत (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्या सह 10 ते 15 साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पौड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रदीप बलकवडे हे सुर्वेवाडी फाट्यावरील सचिन ठोंबरे यांच्या घरात बसले होते. त्यावेळी त्याठिकाणी रमेश जायभाय, शाम सावंत, रोहीत यांच्यासह दहा ते पंधरा साथीदार आले. त्यांच्या हातात पिस्तुल, तलवारी, लोखंडी रॉड आणि काठ्या आदि हत्यारे होती. त्यांनी बलकवडे यांना घरातून बाहेर ओढले. तु तुझी जमीन धनंजय देसाई यांना लिहुन दिली नाहीस तर तुला व तुझ्या पुर्ण कुटूंबाला खलास करून टाकण्यास आम्हाला सांगितले आहे असे म्हणुन बलकवडे यांना बेदम मारहाण केली.
यावेळी आरडाओऱडा होताना रस्त्याने जाणाऱ्या लोकांची गर्दी जमली असता आरोपींनी बघणाऱ्यांच्या दिशेने तलवारी कोयते दाखवून तुम्ही येथे थांबला तर तुमचेही काही खरे नाही, असे ओरडत दहशत माजवली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून अप्पर पोलिस अधिक्षक मितेश गट्टे, हवेली उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली.त्यानंतर दिवसभर पौड पोलिस स्टेशनमध्ये पोलिस ताफ्याची मोठी गर्दी होती. पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव याप्रकरणाचा तपास करीत आहे.