बीजिंग :- चीनमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आतापर्यंत किमान 20 जणांचा मृत्यू झाला असून 27 जण बेपत्ता झाले आहेत. अतिवृष्टीमुळे बीजिंग शहरातील अनेक भागांमध्ये पूर आला आहे. या पुरामुळे रेल्वे वाहतुक बंद करावी लागली आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले आहे. पुराच्या पाण्यामध्ये अनेक कार वाहून गेल्या आहेत, असे सरकारी माध्यमांनी म्हटले आहे.
बीजिंग शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस सहसा होत नाही. बीजिंग शहरात अन्य भागांपेक्षा अधिक तापमान असते. नेहमीच्या उन्हाळ्यामध्ये बीजिंग शहरात उष्णतेची लाट अनुभवायला मिळते. चीनच्या उत्तर भागातही क्वचितच पूर आल्याचे बघायला मिळत असते. मात्र यावर्षी तेथेही आलेल्या पुरामध्ये काही जणांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या दक्षिण भागात दरवर्षी उन्हाळ्यात पूर असतो. तेथील स्थिती अधिकच वाईट झाली आहे. या वर्षी तेथे गेल्या 50 वर्षात झाला नव्हता तेवढा पाऊस झाला आहे.
पूरस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक प्रशासनाने पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याला प्राधान्य द्यावे. जीवित आणि मालमत्तेच्या हानीला कमीत कमी ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, असे आदेश चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिले आहेत.
बीजिंग शहराच्या मध्यभागी पश्चिमेकडील पर्वतांमध्ये 11 लोकांचा मृत्यू झाला आणि 27 बेपत्ता आहेत. हेबेई प्रांतात आणखी नऊ मृत्यूची नोंद झाली आहे. किमान 5 लाख लोकांना या पुराचा तडाखा बसला आहे, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभी अतिवृष्टीमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला होता.
चीनमध्ये 1998 साली यांग्झे नदीला आलेल्या सर्वात भीषण पुरात 4,150 जणांचा मृत्यू झाला होता. 2021 मध्ये हनान प्रांतात आलेल्या पुरात 300 जणांचा मृत्यू झाला होता.