पुणे – शहरात तब्बल 399 जणांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एका दिवसांत सापडलेल्या बाधितांचा हा उच्चांक आहे. पालिका क्षेत्रात पाच हजारांचा टप्पा ओलांडला गेला.
शहरात 9 मार्चला करोनाचा पहिला बाधित सापडला आणि शहरात खळबळ उडाली. तत्काळ लॉकडाऊन घोषित केल्यामुळे भविष्यातही कहर काही दिवसांसाठी थोपवण्यात आला. त्यामुळे 1 एप्रिल पर्यंत म्हणजे महिन्यात करोना बाधितांची संख्या केवळ 32 एवढीच होती. त्यानंतर रूग्ण सापडत होते, मात्र त्याचे प्रमाण काहीसे कमी होते. 15 एप्रिलपर्यंत शहरात बाधितांची एकूण संख्या 279 एवढी झाली. कालांतराने लॉकडाऊन शिथिल झाले आणि नागरिक घराबाहेर पडताच होत्याचे नव्हते झाले. 1 मे ते आतापर्यंतची (25 मे) वाढती संख्या पाहिली तर 25 दिवसांत तब्बल 3 हजार 570 नवीन बाधितांची संख्या वाढली. विशेषतः 14 ते 21 मे दरम्यान 1 हजार 120 तर मागील चार दिवसात तब्बल 1 हजार 74 नवीन बाधित सापडले.
दरम्यान, आज दिवसभरात 175 जणांना घरी सोडण्यात आले असून, त्यातील नायडू रुग्णालयातील 122, ससूनमधील 7 तर खासगी रुग्णालयातील 46 जणांचा समावेश आहे. 179 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामध्ये 44 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आला असून, अन्य बाधित व्यक्तीना अतिदक्षता विभागा ठेवण्यात आले आहे. शहरात एकूण 2 हजार 182 बाधित व्यक्तीवर उपचार सुरू आहेत.
पुणे शहरात पीएमपी तूर्त बंदच होती. पण पुणेकरांची ही आशा फोल ठरणार आहे. रोज निरनिराळ्या ठिकाणी करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. ज्या भागात रूग्ण सापडतो, तो भाग त्वरीत सील केला जातो. त्यामुळे येथील सर्व रस्ते बंद करण्यात येतात. त्याचबरोबर पुण्यातील नाना पेठ, भवानी पेठ, येरवडा या भागात सर्व रस्ते बंद आहेत.
दहा मृत्यू
मागील 24 तासांत करोनामुळे 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोंढवा खुर्द येथील एक 37 वर्षीय व्यक्ती सोडली तर अन्य सर्व मृत व्यक्ती हे वय वर्षे 58 ते 80 वयोगटांतील आहेत. घोरपडी पेठ, येरवडा, चांदणी चौक, खराडी, फुरसुंगी, कोंढवा, ताडीवाला रोड, नाना पेठ या परिसरातील राहणारे आहे.