पुणे : दिवाळी तसेच सणांच्या कालावधीत शहरातर मोठया प्रमाणात रक्त पिशव्यांचा तुटवडा जाणवतो. ही बाब लक्षात घेऊन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वाढदिवसदिनी रक्तदान महासंकल्प दिवस आयोजित करत पुणेकरांना रक्तदान करुन शुभेच्छा देण्याचे आवाहन केले होते.
महापौरांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत महापौरांच्या संकल्पला पुणेकरांनी भरभरून पाठबळ देत दिवसभरात तब्बल 3 हजार 860 रक्तदान केले. यावेळी महापौर मोहोळ यांनी स्वत: मुलगी सिध्दी हीच्या सोबत रक्तदान करत एक अनोखा आदर्श घालून दिला. तब्बल 15 तास हे रक्तदान शिबिर सुरू होते.
महापौर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पुणेकरांना उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या शिबिरात विविध रक्तपेढ्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी या शिबिराला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेशजी करपे,आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर,मनसे शहराध्यक्ष वसंतजी मोरे,आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह नगरसेवक, भाजप पक्षपदाधिकारी, कलाकार, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.
“पुणेकर एकत्र आले तर काय करु शकतात? हे कोरोना संकटाचा सामना करताना दिसून आले होते. सद्यस्थितीत शहरात रक्ताचा तुटवडा असताना पुणेकरांनी रक्तदानासाठी दाखवलेली एकजूट समाधान देणारी होती. हजार पेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदानरुपी दिलेल्या शुभेच्छा नजीकच्या गरजूंना जीवनदान देणाऱ्या ठरणाऱ्या आहेत. रक्तदान करणाऱ्या सर्व पुणेकरांचा मी ऋणी आहे.
– मुरलीधर मोहोळ ( महापौर)
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व कार्यकर्त्यांना नेहमीच सेवा उपक्रमावर भर देण्याचा आग्रह धरतात. त्यालाच अनुसरून मुरलीधर यांनी वाढदिवसाला पुष्पगुच्छ नको रक्तदान करा, असे आवाहन केले. त्या आवाहनाला पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.भविष्यातदेखील त्यांनी असेच लोकोपयोगी उपक्रम राबवावेत, यासाठी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
तर रक्तदानाच्या आवाहनानंतर रक्तदात्यांचा प्रतिसाद लक्षात घेता रक्तपेढ्यांची संख्या 19 पर्यंत वाढवण्यात आली. रक्तदान प्रक्रियेत सुलभता ठेऊन कमी वेळात जास्तीत जास्त दात्यांना सहभागी होता येईल, अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले. त्यामुळेच दात्यांची संख्या 3 हजार800 पेक्षा जास्त झाली असल्याचे या शिबिराचे संयोजक संस्कृती प्रतिष्ठानचे सचिव निलेश कोंढाळकर यांनी सांगितले.