पुणे – लोखंडी जाळीत अडकलेल्या चिमुकल्याची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली आहे. शुक्रवारी (17 नोव्हेंबर) सिहंगड कॉलेज रस्यावर हिंगणे खुर्द, राजश्री सोसायटीत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक लहान बाळ अडकल्याची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळाली होती. त्यानंतर सिहंगड अग्निशमन केंद्र येथून तातडीने अग्निशमन वाहन रवाना झाले आणि त्यांनी चिमुकल्याची सुटका केली.
घटनास्थळी पोहोचताच जवानांना समजले की, दुसऱ्या मजल्यावर एका सदनिकेच्या गॅलरीमध्ये असणाऱ्या लोखंडी जाळीमध्ये एक वर्षाचे बाळ अडकले आहे. दरवाजा देखील बंद झाला आहे. जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच धाव घेतली असता बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि प्रथम अग्निशमन वाहनातील कॉम्बी टुल किटमधील हायड्रोलिक स्प्रेडर व जॅकचा वापर करुन दरवाजाची कडी तोडून पाहिले.
बाळाचे डोके लोखंडी जाळीमध्ये अडकले होते. बाळ तळमळत होते. जवानांनी बाळाच्या आईला त्याच्याजवळ बसवत अगदी कुशलतेने अग्निशमन उपकरण वापरुन त्या बाळाची पाचच मिनिटात सुखरुप सुटका केली. त्यानंतर बाळाच्या आई वडिलांनी अग्नीशमन दलाच्या जवानांनी केलेल्या कामगिरीबद्दल आभार मानले.
या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्र येथील वाहनचालक अशोक कडू,जवान तुषार करे, संभाजी आटोळे, आदिनाथ पवार यांचा सहभाग होता.