शिक्रापूर (पुणे) – शिरूर तालुक्यात शिक्रापूर परिसरातील कोरेगाव भीमा, सणसवाडी परिसरात वाढता करोनाचा धोका लक्षात घेता प्रत्येक गावातील गल्ली व वस्त्यांमध्ये स्वयंसेवक नेमण्याची गरज आहे. त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. करोनाचा सर्वात जास्त संसर्ग ज्येष्ठ नागरिकांना होत आहे, त्यांच्या तपासण्या करण्यावर भर द्या, अशा सूचना प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी आरोग्य विभागास दिल्या आहेत.
शिक्रापूर परिसरात एकाच दिवशी 24 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. याबाबत प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी गावातील प्रमुख ग्रामस्थ, पदाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांसह व्यापारी असोसिएशनची बैठक घेतली. यावेळी गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांच्यासह माजी सरपंच संगीता कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक गव्हाणे, माजी सरपंच विजय गव्हाणे, माजी उपसरपंच योगेश गव्हाणे, नितीन गव्हाणे, कृष्णाबाई गव्हाणे, सुधाकर ढेरंगे, भानुदास सरडे, किरण कुलकर्णी, नितीन राऊत, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस, कामगार तलाठी अश्विनी कोकाटे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलीसपाटील मालन गव्हाणे, आरोग्य सहायक संतोष थिटे, ग्रामस्थ व व्यापारी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी देशमुख यांनी व्यापारी व भाजी विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेत त्यांनी गावातील परंपरागत भाजी विक्रेत्यांना मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याच्या अटीवर परवानगी देण्याच्या सूचना दिल्या. सोशल डिस्टन्सिंगचा वापर न करणाऱ्या दुकानांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. गावातील वाड्या वस्त्यांसह उपनगरातील तरुणांना स्वयंसेवक नेमून अधिकार देण्याच्या पोलीस व ग्रामविकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. कोरेगाव भीमा येथे मास्क न वापरणाऱ्या व नियमांचे पालन न करणाऱ्या 30 जणांवर कारवाई करीत 5 हजार 750 रुपयांचा दंड वसूल केला आहे.