पुणे – देशात ठिकठिकाणी जन औषध केंद्र सुरू करण्यात आले. त्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असून, पैसांची बचत झाली आहे. त्यामुळे नागरिकांनीच या जन औषध केंद्राला “मोदींचे स्वस्त औषधांचे दुकान’ असे नाव ठेवले आहे, असे मत केंद्रीय पर्यावरण, वने, हवामान बदल, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील ससून रुग्णालयात जन औषध केंद्र सुरू करण्यासाठी निवड केली. त्यानुसार आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेवक गणेश बिडकर, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, अधिक्षक डॉ. अजय तावरे, डॉ. हरीष टाटिया, डॉ. इब्राहिम अन्सारी तसेच जनऔषधी केंद्र संचालक मनीष ओसवाल उपस्थित होते.
प्रकाश जावडेकर म्हणाले, देशात दहा कोटी शौचालय बांधली. त्यामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये शौचालयाची सुविधा कमी असल्यामुळे परिस्थिती अत्यंत वाईट होती. त्याठिकाणी शौचालय बांधल्यावर तेथील नागरिकांनी शौचालयाला “इज्जत घर’ असे नाव दिले. ज्यावेळी लोक नाव देतात ते जास्त सार्थक असते. सर्दी, तापाची साथ होती त्यावेळी मी बाजारातून 87 रुपयांचे औषध आणले. तेच औषध या जन औषध केंद्रामध्ये 24 रुपयाला आहे. एवढा मोठा फरक यामध्ये आहे. जी औषधे सगळ्या दुकानांमध्ये मिळतात, त्यातील 500 औषधांच्या किंमती मर्यादीत ठेवल्या, त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे.
जनऔषधी ही उच्च गुणवत्तापूर्ण असून ती स्वस्त आहेत. त्यामुळे ती रुग्णांनी वापरण्याचे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शिल्पा नाईक तर आभार मनीष ओसवाल यांनी मानले.
समर्पित भावनेतून कोणतेही काम केले तर बदल घडतोच…
कोणतेही काम समर्पित भावनेतून केल्यावर बदल हा घडतोच, त्याचा प्रत्यय आज ससून रुग्णालयात आल्यावर येतो. ससूनशी माझे रक्ताचे नाते आहे. डॉ. अजय चंदनवाले आणि त्यांच्या टीमने मागील काही वर्षात ससूनचा चेहरा बदलण्यात मोलाचा वाटा आहे. त्यामुळे गरीबांसह सर्वसामान्य व्यक्तीही उपचारासाठी ससूनमध्ये येत आहेत. हे सर्व श्रेय डॉ. अजय चंदनवाले यांना जाते, असे सांगत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांचे कौतुक केले.