वयाच्या 60 व्या वर्षी थाटला मैत्रिणीसोबत संसार
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुकूल वासनिक वयाच्या 60 व्या वर्षी विवाहबंधनात अडकले आहेत. रविवारी मुकूल वासनिक यांचा विवाहसोहळा पार पडला. मुकूल वासनिक यांनी आपली मैत्रीण रवीना खुरानासोबत लग्न केले आहे. दिल्लीमधील मौर्या शेरेटॉन या पंचतारांकित हॉटेलमध्ये काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. मुकूल वासनिक आणि रवीना खुराना जुने मित्र आहेत. रवीना खुराना एका खासगी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहेत. दरम्यान, या विवाह सोहळ्यासाठी कॉंग्रेसचे दिग्गज नेते अशोक गहलोत, मनिष तिवारी,अहमद पटेल, अंबिका सोनी ,गुलाम नबी आझाद या विवाह सोहळ्याला उपस्थित होते.
Wishing Mukul Wasnik Ji and Raveena Khurana Ji heartiest congratulations on embarking on this new journey together as a couple. May the coming years prove to be the happiest time of your life. Stay blessed. pic.twitter.com/XPVMx0CjXf
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) March 8, 2020
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करत मुकूल वासनिक यांच्या लग्नाची माहिती दिली. ट्विट करत त्यांनी मुकूल वासनिक यांना आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी दोघांचे फोटोही शेअर केले. कॉंग्रेस नेते मनिष तिवारी यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून फोटो शेअर करत शुभेच्छा दिला. यावेळी त्यांनी लिहिले की, मी आणि नाजनीन (पत्नी) नवे विवाहित जोडपे मुकूल वासनिक आणि रवीना खुराना यांना आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देत आहोत. मुकूल वासनिक यांच्याशी माझी पहिली भेट 1984 तर रवीना यांच्याशी 1985 मध्ये वर्ल्ड फेस्टिव्हल ऑफ यूथ अँण्ड स्टुडंट्सच्या वेळी मॉस्को येथे झाली होती. मी दोघांसाठी खूप आनंदी आहे. त्यांना खूप आशिर्वाद.
मुकुल वासनिक हे कॉंग्रेसशी निष्ठा असलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ते तीन वेळा खासदार राहिलेल्या बाळकृष्ण वासनिक यांचे मुकुल वासनिक पुत्र आहेत. मुकुल वासनिक 2009 मध्ये नागपूरमधील रामटेक लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. बुलडाणा मतदारसंघातूनही ते तीनवेळा खासदार होते. 1984 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी संसदेत जाणारे ते सर्वात तरुण खासदार ठरले होते. वासनिक यांनी केंद्रीय मंत्रिपदही भूषवले. वासनिक हे 1988 मध्ये राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (एनएसयूए) च्या अध्यक्षपदी निवडून आले. मध्ये भारतीय युवा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं वासनिक यांच्याकडे आली.