बीड – अंबाजोगाई शहर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाने 40 हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे. या घटनेनेनंतर अंबाजोगाई शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
गोपाल दिंगबरा सुर्यवंशी (वय-34) रा. कामखेडा, ता रेणापुर असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सुर्यवंशी बीड येथील अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. दाखल गुन्ह्यात प्रतिबंधक कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे न पाठवता, तहसिल कार्यालयात जामीन करण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी सुर्यवंशी याने केली होती. तडजोडी अंती 40 हजार रुपये सुर्यवंशी याने घेतल्याचे एसीबीसमोर मान्य केले.