पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 350 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. त्यासोबतच किल्ले शिवनेरीवर संग्रहालय उभे करण्यात येणार आहे. अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी शिवाजीनगरच्या पोलीस ग्राउंडवर हजेरी लावली. ध्वजावंदनानंतरच्या भाषणात बोलताना पाटील यांनी राज्यहिताच्या काही महत्वाच्या बाबी नमूद केल्या.
यावेळी पाटील यांच्या हस्ते पोलीस खात्याला नवीन मिळालेल्या 25 बोलेरो गाड्या प्रदान करण्यात आल्या. तसेच पोलीस दलातील ऑस्कर या श्वानाने यावेळी पाटील यांना मानवंदना दिली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी हुतात्म्य स्मृतींना अभिवादन देखील केले.
महाराष्ट्र सुधारक, गडकिल्ले, ही आपली ओळख आहे त्यामुळे या सर्वांची जपवणूक करणं आवश्यक असल्याचे देखील पाटील यावेळी म्हणाले. महाराष्ट्र चळवळीसाठी 108 हुतात्म्यांनी बलिदान दिले त्यांच्या स्मृतींस अभिवादन करतो असं म्हणत त्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. अर्थसंकल्पात गतीमानतेचं प्रतीक दिसून आलं आहे. किल्ले शिवनेरीवर संग्रहालय उभं करण्यात येणार आहे. गडकिल्ल्यांसाठी 350 कोटीची तरतूद करण्यात आली आहे, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं. तसेच शासनाने कायम शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पाठिंबा दिला असल्याचे देखील यावेळी त्यांनी अधोरेखित केले.