सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने
नगर – वसतिगृहाच्या फी वाढ विरोधात आंदोलन करणाऱ्या जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा व जेएनयू प्रशासनाचा सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध नोंदविण्यात आला.
दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने वसतीगृहाची तीनशेपटीने फी वाढवली आहे. यासाठी जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले. विद्यार्थ्यांचा प्रश्न न सोडविता जेएनयू प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आंदोलक विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज केला.
या घटनेचा सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सागर भिंगारदिवे यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदविण्यात आला. जेनयूच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळावा, देशभरात विद्यार्थ्यांवर हल्ले वाढत चालले असून, यूजीसी बरखास्त करून उच्च शिक्षण आयोग विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात येणार असल्याच्या विरोधात आणि मद्रासची विद्यार्थिनी फातिमा हीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
सदर मागण्यांचे निवेदन गृह शाखेचे आर.जे. दिवान यांना देण्यात आले. यावेळी सुनील शिंदे, विनोद गायकवाड, किरण जाधव, हनीफ शेख, योगेश थोरात, भूषण कांबळे, स्वप्नील मोकळ, संजय शिंदे, शुभम गायकवाड, बापू विधाते, किरण जाधव आदींसह विद्यार्थी व पदाधिकारी उपस्थित होते.