नवी दिल्ली – शाहिन बाग परिसरामध्ये शेकडो महिलांकडून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्याविरोधात केल्या जात असलेल्या धरणे आंदोलनाच्या विरोधात आज स्थानिक नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. या नागरिकांनी धरणे धरणाऱ्या महिलांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “वंदे मातरम’ आणि “जय श्रीराम’च्या घोषणाही यावेळी दिल्या गेल्या.
“सीएए’विरोधातील आंदोलनाच्या विरोधात शाहिन बाग आणि परिसरामध्ये कोणालाही आंदोलन करण्याची परवानगी दिली गेलेली नाही. त्यामुळे या स्थानिक आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी लवकरच या ठिकाणावरून घालवून दिले, असे दक्षिण-पूर्व दिल्लीचे पोलीस उपायुक्त चिन्मय बिस्वाल यांनी सांगितले.
पोलीसांनी कपिल गुज्जर नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. गुज्जर दिल्ली- नोयडा सीमेजवळील दल्लुपुरा गावातील रहिवासी आहे. शाहिन बागेतील आंदोलनामुळे या मार्गावर सातत्याने वाहतुक कोंडी होत आहे. गुज्जर यांच्या चुलत भावाचे लग्न जवळ आले असल्याने या वाहतुक कोंडीचा त्रास होत असल्याचे चौकशीदरम्यान त्यांनी पोलिसांना सांगितले.
“सीएए’च्या विरोधात शाहिन बागेमध्ये 15 डिसेंबरपासून धरणे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे कालिंदी कुंज रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.