बंगळुरु :- प्रो-कबड्डी लीगमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात पुणेरी पलटणने बलाढ्य यु मुम्बा (#MUMvPUN) संघावर मात केली. यंदाच्या मोसमात बाद फेरीपर्यंत आपली दावेदारी आणखी भक्कम करताना पुणेरी पलटणने अतीतटीच्या लढतीत यु मुम्बावर 30-28 असा अवघ्या दोन गुणांनी रोमहर्षक विजय मिळवला. या लढतीत पुणेरी पलटणच्या अस्लम इनामदारचा खेळ निर्णायक ठरला.
And the bragging rights belong to @puneripaltanofficial 🚩
How nail-biting was this #MahaDerby 🧡⚔️🧡#vivoProKabaddi #FantasticPanga #PUNvMUM pic.twitter.com/GX9xvG6nbo
— ProKabaddi (@ProKabaddi) October 16, 2022
या सामन्याला प्रारंभ झाल्यापासून पहिले सत्र संपण्यापूर्वी दोन्ही संघांची गुणांच्या बाबतीत अफलातून चुरस रंगत होती. प्रत्येक क्षणाला सामन्याचे पारडे फिरत होते. पुणेरी पलटणच्या अस्लम इनामदारने तब्बल 9 गुण प्राप्त करत चांगल्या पकडी केल्या. त्याला मोहित गायातने सुरेख साथ दिली. यु मुब्बाच्या खेळाडूंना दुसरे सत्र संपण्यापूर्वी चांगली संधी होती मात्र, त्यात ते यशस्वी ठरले नाहीत. गुमानसिंग व जय भगवान यांनी केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले व हा सामना पुणेरी पलटणने जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.
यापूर्वी झालेल्या सामन्यात जयपूर पिंक पॅंथर्सने गुजरात जायंट्सचा 25-18 असा पराभव केला. या लढतीत राहुल चौधरी व भवानी राजपूत यांनी दर्जाला साजेसा खेळ केला. याउलट सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळखल्या जात असलेल्या गुजरातच्या प्रतिक दहियाला फारशी चमक दाखवता आली नाही. त्यानंतर झालेल्या लढतीत दबंग दिल्लीने तेलगु टायटन्सचा 46-26 असा पराभव केला. दिल्लीच्या नविन कुमार व मनजीत यांनी अफलातून पकडी करत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. त्यानंतर झालेल्या बंगाल वॉरिअर्सने मोठा विजय प्राप्त करताना पाटणा पायरट्सवर 54-26 अशी मात केली. बंगालच्या मनिंदर सिंग व श्रीकांत जाधवने मोक्याच्या क्षणी पकडी केल्याने त्यांची संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखले.