नगर -मध्यवर्ती नगर शहर कोअर एरिया म्हणून घोषित केल्याने आज माळीवाडा, चितळे रस्त्यावर बसलेल्या भाजीपाला व फळ विक्रेत्यांना हटविण्यात आले. त्यांना या ठिकाणी बसण्यास पोलिसांनी प्रतिबंध केला. यावेळी पुन्हा या ठिकाणी बसल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी ध्वनिक्षेपकावरून दिला. सुभेदारगल्ली परिसरात सहा, तर रस्त्यावर सारसनगरमध्ये दोन करोना रुग्ण आढळल्याने नगर शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या आठवर गेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अधिक सर्तक राहून या दोन्ही परिसरांतील दोन किलोमीटरपर्यंत सर्व व्यवहार बंद केले आहे. हा सर्व परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केला आहे.
सुभेदारगल्ली परिसर 27 मेपर्यंत हॉटस्पॉट म्हणून जाहीर केला आहे. या परिसरासह दोन किलोमीटरचा परिसर पूर्ण सील करण्यात आला असून, त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवांसह बॅंका देखील बंद करण्यात आल्या आहेत. आज सकाळी माळीवाडा व चितळे रस्त्यावर भाजीपाला व फळविक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती. पण पोलिसांनी ध्वनिक्षेपकावरून सुचना देवून त्यांना हटविले. तेथे बसल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.