दौंड – राज्य राखीव पोलीस दलातील 15 जवानांनी करोनावर मात केली आहे. या जवानांना करोनाची लागण झाल्याचे 8 मे रोजी निष्पन्न झाले होते. या जवानांची दुसऱ्यांदा करोनाची चाचणी केली असता त्यातील चौदा जवान निगेटिव्ह आढळून आले आहेत, तर एका जवानाचा अहवाल येणेबाकी असल्याची माहिती राज्य राखीव पोलीस दल गट क्र. 7 च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली खान यांनी दिली.
संचारबंदीदरम्यान मुंबईसह राज्यातील इतर भागांमध्ये येथील जवानांना बंदोबस्तासाठी जावे लागते. राज्य राखीव पोलीस दलाच्या गट 7 च्या 95 जवानांची तुकडी 6 मे रोजी दौंड येथे दाखल झाली होती. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता, त्यातील 15 जवान पॉझिटिव्ह निघाले होते. यापूर्वी तालुक्यातील 8 जवानांनी 10 मे रोजी करोनावर मात केली आहे.
या 14 जवानांना सात दिवस घरीच विलगीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान, करोना राज्य राखीव पोलीस दलाची पाठ सोडत नाही असे चित्र असतानाच मागील काही दिवसांत 8 व सोमवारी 14 अशा 22 जवानांनी करोनावर मात करत विजय मिळवला आहे.