थिरुवनंतपुरम : इस्रो अर्थात, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कमी खर्चातल्या उपग्रह प्रक्षेपकांची निर्मितीसाठी तयारी करत असल्याची घोषणा इस्रोचे उपसंचालक हरिदास टी.व्ही. यांनी केली आहे. ते शुक्रवारी थिरुअनंतपुरम इथं झालेल्या एज टू थाऊसंड ट्वेंटी या अंतराळविषयक परिषदेत बोलत होते.
अशा प्रकारच्या एका प्रक्षेपकासाठीचा निर्मिती खर्च 30 ते 35 कोटी रुपयांपर्यंत असेल, असं त्यांनी सांगितले. या प्रक्षेपकाद्वारे 500 किलो वजनापर्यंतचा उपग्रह अंतराळात नेता येऊ शकेल असे हरिदास यांनी सांगितले.
यामुळे इस्रो अंतराळ व्यवसाय क्षेत्रात छोट्या ते मध्यम स्वरुपाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने सक्षम होऊ शकेल, आणि त्यातूनच इस्रोला या व्यवसाय क्षेत्रात पाय रोवण्याची मोठी संधी निर्माण होईल.
याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इस्त्रो अवघ्या तीन आठवड्यांच्या उलट काळात ही वाहने तयार करु शकेल, असे हरिदास यावेळी म्हणाले.
प्रक्षेपण वाहनांसाठी इस्रोने 1,600 दशलक्ष डॉलर अपेक्षित ठेवले आहेत, त्यापैकी 870 दशलक्ष डॉलर पीएसएलव्हीसाठी आणि उर्वरित जिओसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपण वाहनासाठी असतील. इस्रोने येत्या पाच वर्षांत सुमारे 50 ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनांच्या प्रक्षेपणाचे नियोजन केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.