मलठण, (वार्ताहर) – काळेवाडी (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शाळेची गोडी, प्रेम, जिव्हाळा निर्माण व्हावा व शाळेची भीती नाहीशी व्हावी, यासाठी शाळा पूर्व तयारी मेळावा व इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना निरोप समारंभ नुकताच पार पडला. तसेच दाखल पात्र विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
पालकांच्या व शाळा व्यवस्थापन अध्यक्षांच्या हस्ते फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. दाखल पात्र विद्यार्थ्यांना छोट्या कारमधून व्यासपीठापर्यंत आणले व त्यांच्या पायांचे ठसे घेऊन औक्षण करण्यात आले. तसेच गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या विद्यार्थ्यांची वर्ग पूर्वतयारी तपासण्यासाठी उंची वजन घेऊन नोंदणी केली.
बौद्धिक, शारीरिक भाषिक सामाजिक व भावनिक विकास तसेच गणन पूर्व तयारी असे वेगवेगळे सुंदर व आकर्षक टेबल शिक्षकांनी व पालकांनी सुसज्ज तयार करून ठेवले होते. प्रत्येक टेबलवर तपासणीस उपयुक्त असे साहित्य ठेवण्यात आले व शिक्षक व उच्चशिक्षित पालकांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले.
सर्व दाखल पात्र विद्यार्थ्यांची शाळा पूर्व विकासाची चाचणी त्यांच्या पालकांसमोर करून तशी नोंद घेण्यात आली. यानंतर इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक ज. शं. भोसले यांनी आभार मानले.