मलठण, (वार्ताहर)- दौंड तालुक्यातील काळेवाडी येथील ग्रामदैवत श्री कानिफनाथ यात्रेत जंगी निकाली कुस्त्यांचा आखाड्यात पै. माऊली जमदाडे विरुद्ध बंटी पाटील यांची शेवटची मानाची लढत झाली. यामध्ये पै. माऊली जमदाडे याने बंटी पाटील यास चितपट करून विजय मिळवला.
रंगपंचमीच्या तिथीवर ग्रामदैवत श्री कानिफनाथ देवाची यात्रेत श्रींची महापूजा झाली. सासवड येथील बोपदेव या ठिकाणाहून ज्योत आणण्यात आली. संपूर्ण काळेवाडी गावात मानाची काठी मिरवणूक काढली. माता भगिनींनी दंडवत घातले. गोड पदार्थांची शेरणी वाटण्या बरोबर सर्व धार्मिक कार्यक्रम परंपरा व प्रथेप्रमाणे झाले. वारकरी सांप्रदायातील भजनी मंडळ व गावकऱ्यांच्या वतीने हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे.
कुस्त्यांचे मैदान भरवण्यात आले. यामध्ये ऋषिकेश गायकवाड विरुद्ध मोहेल पटेल, नागेश गायकवाड विरुद्ध सुजय राऊत या प्रमुख कुस्त्यांबरोबर इतर सर्व वयोगटांतील कुस्त्या खेळवण्यात आल्या. अनेक मल्लांनी सहभाग नोंदवला. हा आखाडा पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांची मोठी गर्दी होती. यावेळी बक्षिसांची खैरात करण्यात आली.
मैदानाचे उद्घाटन ज्येष्ठ मार्गदर्शक सेवानिवृत्त शिक्षक गुलाबराव पहाणे यांनी केले, मानाची शेवटची कुस्ती सिद्धटेकचे पुरोहित शंभू काका, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट) दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, सचिन कदम यांच्या हस्ते लावण्यात आली. पैलवान माऊली जमदाडे यांनी मैदान गाजवले.
काळेवाडीचे महाराष्ट्र केसरी पै. दत्ता गायकवाड यांच्या मार्गदर्शन व नियोजनाने व रामभाऊ टुले, उद्योगपती केशव ढवळे, उद्योगपती गणेश कड, सचिन काळभोर यांच्या उपस्थितीत कुस्त्यांचा आकडा यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाचे समालोचन प्रशांत भागवत व किसन काळे यांनी केले.