लोणी काळभोर/सोरतापवाडी- ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उरूळी कांचन येथील बेकायदेशीरपणे ताडी व दारू विक्री करणाऱ्या दोन अड्डयांवर छापा टाकला. यामध्ये 2,040 रुपयांची ताडी व विदेशी दारू जप्त करून कारवाई केल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
बेकायदेशीर ताडी अड्डा चालविणारा व्यक्ती अनंता नागप्पा भंडारी व दारूविक्री करणारी महिला अलकाबाई हनुमंत कांचन (दोघे रा. उरूळी कांचन, जयमल्हार रोड ता. हवेली) या दोघांवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये लोणीकाळभोर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचा मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, विजय माळी, राजेंद्र पुणेकर, महेश गायकवाड, नीलेश कदम, गुरू गायकवाड, दैवशीला डमरे यांच्या पथकास उरूळी कांचन येथील जय मल्हार रोड, सुतारआळी येथे अवैध ताडी व दारू विक्री होत असल्याची माहिती बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार पथकाने उरूळी कांचन दूरक्षेत्राचे पोलीस नाईक विजय गाले व सचिन पवार यांची मदत घेऊन सायंकाळच्या सुमारास जयमल्हार रोड, सुतारआळी येथे दोन ठिकाणी अचानक छापे टाकले. बिगर परवाना व बेकायदेशीरपणे विक्रीसाठीसाठा केलेली 9 लिटर ताडी, विदेशी दारू व इतर साधने असा एकूण किंमत रुपये 2,040 रुपयांचा मुद्दे जप्त केलेला आहे. या प्रकरणाचा तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.