मंचर- अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील गावात विविध समस्यांनी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.ग्रामपंचायतीचे सदस्यांमध्ये विकासकामे करताना समन्वय नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी टिकत नसल्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. ग्रामविकास अधिकारी रजेवर गेल्याने गावातील विकासकामांना खीळ बसली आहे.
अवसरी बुद्रुक गावचे ग्रामविकास अधिकारी एम. जे. चौगुले यांची एक वर्षापूर्वी पेठ येथे बदली झाली. त्यांच्या 12 वर्षांच्या कालावधीत त्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली; परंतु काही सदस्यांच्या मनमानीमुळे ग्रामविकास अधिकारी चौगुले यांनी बदली करून घेतली. त्यांनतर ग्रामविकास अधिकारी अशोक गावडे यांची एक वर्षापूर्वी नियुक्ती झाली.ग्रामपंचायतमधील सदस्यांमध्ये विकासकामांबाबत समन्वय नसल्याने प्रशासनाला काम करणेही अवघड झाले आहे. काही ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकाऱ्याला विश्वासात न घेता कामे करतात.
ग्रामविकास अधिकाऱ्याला फैलावर घेणे, गावातील अतिक्रमणाचा विषय यामुळे ग्रामविकास अधिकारी अशोक गावडे वारंवार वैद्यकीय रजेवर जात आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. सद्यःस्थितीतही ग्रामविकास अधिकारी रजेवर गेल्याने त्यांच्या जागेवर पिंपळगाव येथील ग्रामविकास अधिकारी के. डी. फाकटकर यांच्याकडे चार्ज आहे; परंतु त्यांच्याकडे पिंपळगांव येथील ग्रामपंचायतीचा पदभार असल्याने ते अवसरी गावाला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने गावातील विकास कामांना खीळ बसली आहे. विकासकामांसाठी लागणारे आर्थिक व्यवहार होत नाहीत. त्यांनी बॅंकेतील सह्यांचे अधिकारही घेतले नाहीत, त्यामुळे विकासकामांवर त्याचा परिणाम झाला आहे.
एक वर्षापूर्वी बारा ते तेरा घरकुले मंजूर होऊन बांधकाम पूर्ण झाले आहे; परंतु त्यांना 40 हजार रुपयांचा एकच हफ्ता मिळाला आहे. राहिलेली रक्कम मिळण्यासाठी सहा महिन्यांपासून मागासवर्गीय महिला ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. तरीही चेक मिळत नसल्याने घरकुलधारकांचा सरपंच आणि उपसरपंच यांच्याशी वाद होत आहेत.
- आठवड्यातून दोन दिवस एक तास काम
तात्पुरता चार्ज असलेले ग्रामविकास अधिकारी के .डी. फाकटकर हे पुर्ण वेळ पिंपळगाव येथे कार्यरत असल्याने अवसरी बुद्रुक ग्रामपंचायत येथे आठ दिवसातून दोन दिवस दुपारी बारा ते एक वाजता येतात. तोपर्यंत गावातील ग्रामस्थ घरी निघून जातात. ग्रामस्थांना ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या सह्या वेळेत मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.
गावातील विविध विकास कामांचे प्रस्ताव पुणे जिल्हा परिषदेला पाठवायचे आहे; परंतु ग्रामविकास अधिकारी पुर्णवेळ नसल्याने विकासकामे रखडली आहेत.असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
- याबाबत सरपंच आणि उपसरपंच यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्याशी पत्रव्यवहार करून गावाला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी द्यावा अशी मागणी करणार आहे, तसेच गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्याशीही ग्रामविकास अधिकारी देण्याबाबत चर्चा झाली आहे.
– पवनकुमार हिले, सरपंच आणि सचिन हिंगे उपसरपंच, अवसरी बुद्रुक - तालुक्याचे यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले
निरगुडसर, घोडेगाव, शिंगवे, महाळुंगे पडवळ, अवसरी बुद्रुक गावासाठी ग्रामविकास अधिकारी नाही. ग्रामविकास अधिकारी उपलब्ध होण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवला आहे. ग्रामविकास अधिकारी उपलब्ध झाल्यानंतर प्राधान्याने अवसरी बुद्रुक गावाला ग्रामविकास अधिकारी दिला जाईल.तुर्त के.डी.फाकटकर यांच्याकडे चार्ज असुन ते सर्व कामकाज वेळेत पूर्ण करतील.
जालिंदर पठारे, गटविकास अधिकारी