नवी दिल्ली : ब्रिटनचे युवराज विल्यम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत. काही दिवसापूर्वीच विल्यम आणि केट यांनी लंडनमधील आगा खान सेंटरला भेट दिली होती. यावेळी त्यांनी पाकिस्तानी संस्कृतीबद्दल माहिती घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांबरोबर पाकिस्तानी संगितकार, आचारी, कलाकारांशीही चर्चा केली.
आगा खान सेंटरला दिलेल्या या भेटीदरम्यान विल्यम आणि केट या दोघांनीही आपल्या आगामी पाकिस्तानी दौऱ्यामध्ये तेथील अनेक पदार्थांची चव घेण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी केट यांनी मी अनेकदा घरीच करी (आमटी) बनवते. छोटे युवराज जॉर्ज, युवराज लुईस आणि युवराज्ञी शार्लोटसाठी मी कमी तिखट तर माझ्यासाठी आणि विल्यमसाठी तिखट करी बनवते. सर्वांसाठी वेगवेगळ्याप्रकराची करी बनवणे कठीण आहे. मुलांना कमी तिखट,
विल्यमला थोडी फार तिखट तर मला खूप तिखट करी बनवणे खूपच त्रासदायक आहे, अशी माहिती दिली होती.
दरम्यान, दोन्ही युवराज हे खाण्याच्या बाबतीत वडील विल्यम यांच्यावर गेले असून युवराज्ञी शार्लोट ही आईसारखी असल्याचे यावेळी ब्रिटनच्या राजघराण्यातील दांपत्याने सांगितले. युवराज्ञी शार्लोटला आईप्रमाणे तिखट खायला आवडते, तर दोन्ही मुले वडिलांप्रमाणे कमी तिखट खाणे पसंत करतात, असे विल्यम यांनी स्पष्ट केले.