प्रिन्स फिलीप यांचं वयाच्या 99व्या वर्षी निधन

लंडन – राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं वयाच्या 99व्या वर्षी निधन झालं. बकिंगहॅम पॅलेसने ही घोषणा केली. फिलीप आणि महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा 73 वर्षाचा सहवास राहिला. प्रिन्स फिलीप यांच्या निधनाने संपूर्ण ब्रिटनमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

“अत्यंत दुःखाने ‘हर मॅजेस्टी’ राणी एलिझाबेथ त्यांचे प्रिय पती ‘हिज रॉयल हायनेस द प्रिन्स’ फिलीप, ‘ड्यूक ऑफ इडिनबरा’ यांच्या निधनाची बातमी जाहीर करत आहेत. हिज रॉयल हायनेस यांनी आज सकाळी विंडसर कॅसलमध्ये अखेरचा श्वास घेतल्याचं, पत्रक बकिंगहॅम पॅलेसकडून प्रसिद्ध करण्यात आलं. राणी एलिझाबेथ (द्वितीय) आणि प्रिन्स फिलीप यांचं लग्न 1947 मध्ये झालं. त्यांना चार मुलं, आठ नातवंडं आणि दहा पतवंडं आहेत.

त्यांचे पहिले पुत्र प्रिन्स ऑफ वेल्स, प्रिन्स चार्ल्स यांचा 1948 मध्ये जन्म झाला होता, त्यांच्यानंतर त्यांच्या भगिनी, द प्रिन्सेस रॉयल, प्रिन्सेस ॲन यांचा 1950 मध्ये, 1960 साली ड्यूक ऑफ यॉर्क प्रिन्स अँड्र्यू यांचा आणि 1964 साली अर्ल ऑफ वेलेक्स प्रिन्स एडवर्ड यांचा जन्म झाला.

प्रिन्स फिलीप यांचा 10 जून 1921 रोजी कोर्फू या ग्रीक बेटावर जन्म झाला होता. त्यांचे वडील प्रिन्स अँड्र्यू ऑफ ग्रीस अँड डेन्मार्क हे राजे जॉर्ज (प्रथम) ऑफ हेलेनेस यांचे कनिष्ठ पुत्र होते. त्यांच्या आई प्रिन्सेस ॲलिस लॉर्ड माउंटबॅटन यांची मुलगी आणि राणी व्हिक्टोरिया यांची नात होत्या.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.