न्यू जर्सी – अमेरिकेत एका भारतीय दांपत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मूळचे बीडमधील असणाऱ्या या दाम्पत्याचा मृत्यूबद्दल पीटीआयने वृत्त दिले आहे. अमेरिकी मीडियाच्या वृत्तानुसार, न्यू जर्सीमधील नॉर्थ अर्लिंग्टन येथील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या दांपत्याचा चाकूने वार झाल्यामुळे मृत्यू झाला आहे.
बालाजी भारत रुद्रवार (32) आणि आरती बालाजी रुद्रवार (30) अशी या मृत पती-पत्नीची नावे आहेत. या दाम्पत्यावर चाकूने हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती कळते. त्यांची मुलगी बाल्कनीत उभी राहून रडत असल्यामुळे ही घटना उडकीस आली.
बालाजी यांचे वडील भारत रुद्रवार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची नात बाल्कनीत एकटीच रडत असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी घरात प्रवेश करुन बघितल्यावर त्यांना मृतदेह आढळले. वैद्यकीय तपासणीत चाकूने वार केल्याचे समोर आले असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे.
मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून पोस्टमार्टमची रिर्पोट देण्यात येईल असे वडीलांना सांगण्यात येत आहे. भारत रुद्रवार यांनी सांगितलं की माझी सून सात महिन्यांची गर्भवती होती. आम्ही एकदा तेथे गेलो होतो. तसेच पुन्हा अमेरिकेला जाण्याबद्दल विचार सुरु होता. दरम्यान, आयटी कंपनीत कामाला असणारे बालाजी रुद्रवार हे ऑगस्ट 2015 मध्ये पत्नीसोबत अमेरिकेत स्थायिक झाले होते.