नवी दिल्ली : मित्रांबरोबर पैज लावणे आणि त्यातही काहीतरी स्टंट करणे हे आजकालच्या मुलांसाठी नॉर्मल गोष्ट बनत चालली आहे. मात्र कधी कधी या गोष्टी आपल्यासाठी किती घातक असू शकतात याची कल्पना देखील कोणी करू शकत नाही. कारण बिहारमध्ये अशीच मित्रांसोबतची एक पैज एक मुलाच्या जीवावर बेतली आहे,
बिहारच्या गोपालगंजमध्ये मित्रांसोबत मोमोज खाण्याच्या पैजेमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. तरुणाने आपल्या मित्रांसोबत पैज लावल्यानंतर मोमोचे जास्त प्रमाणात सेवन केले होते, त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपालगंजचा २५ वर्षीय बिपीन कुमार पासवान हा मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात काम करायचा. बिपिन कुमार पासवान गुरुवारी मित्रांसोबत मोमोज खायला आला होता. बिपिनच्या मित्रांनी पैज लावली की जास्तीत जास्त मोमोज कोण खाऊ शकतो. यानंतर बिपीनने प्रमाणपेक्षा जास्त मोमोज खाल्ले. त्यानंतर त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने मित्रांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
तर दुसरीकडे बिपिनच्या वडिलांनी आपल्या मुलाला विष पाजले गेल्याचा आरोप केला आहे. बिपिनच्या मित्रांनी त्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, त्यांच्या तक्रारीनंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.