लंडन – एलिझाबेथ राणीचे पती प्रिंस फिलिप यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. ब्रिटनच्या राजघराण्याचा वारसा त्यांनी अत्यंत समर्थपणे सांभाळला होता. अतिशय स्पष्ट वक्ते असलेले प्रिंस फिलीप हे नौदलाचे माजी कमांडर होते. निवृत्तीनंतर त्यांनी ब्रिटनच्या महाराणींना साथ करीत आपले आयुष्य अनेक प्रकाराच्या सामाजिक कार्यात व्यतित केले. त्यांचा उल्लेख ड्युक ऑफ एडिंबरो असा केला जात असे.
गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांना 16 फेब्रुवारी रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हदयात संसर्ग झाला होता. त्यावर त्यांच्यावर तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचे देहावसन झाले. त्यांचा आणि ब्रिटनच्या महाराणींचे वैवाहिक आयुष्य सुमारे 73 वर्षांचे आहे. ते त्यांच्या वयाच्या 96 व्या वर्षी म्हणजे सन 2017 मध्ये सार्वजनिक कार्यातून निवृत्त झाले होते. येत्या जून महिन्यात त्यांचा शंभरावा वाढदिवस साजरा होणार होता पण त्याच्या काही महिने आधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
प्रिंस फिलीप यांच्या निधनाबद्दल जगभरातून शोक संदेश येण्यास सुरूवात झाली आहे. गेले काही दिवस ते आणि महाराणी एलिझाबेथ यांना कोविड संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी पश्चिम लंडन मधील विंडसर कॅस्टल या राजविलासात स्वतंत्रपणे ठेवण्यात आले होते. तेथे ते क्वचित सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत असत.
गेल्या जुलै महिन्यात विंडसर कॅस्टल मध्ये झालेल्या लष्करी कार्यक्रमावेळी ते उपस्थित होते. तोच त्यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला आहे. या दाम्पत्याला चार मुले,आठ नातू आणि नऊ पणतू आहेत. प्रिंस फिलीप आणि राणी एलिझाबेथ यांचा विवाह सन 1947 साली झाला होता.