नवी दिल्ली : तब्बल ७० वर्षांनंतर देशात नामशेष झालेले चित्ते पुन्हा एकदा दाखल झाले आहेत. नामिबियातून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले आहेत. आठ चित्त्यांमध्ये ५ मादी आणि 3 नर आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडण्यात आले.
कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. चित्त्यांना एक महिना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. कुनो नॅशनल पार्क हे 748 चौरस किलोमीटरवर पसरलेले संरक्षित क्षेत्र आहे. या पार्कमध्ये चित्त्यांसाठी 12 किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे. चित्त्यांना सुरुवातीला या अधिवासात ठेवण्यात येणार आहे.
भारतात आणलेल्या चित्त्यांना भारतातील वातावरणाशी जुळवून घेण्याचे आव्हान असणार आहे. चित्त्यांना 24 तास देखरेखीखाली ठेवण्यात येईल. त्यांना 12 किलोमीटरच्या विशेष अधिवासात विलगीकरणात म्हणजेच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे.
चित्त्यांना येथील प्राण्यांची शिकार करावी लागेल. भारतात आढळणारे हरीण आफ्रिकेत आढळत नाही. त्यामुळे या प्राण्याची शिकार करणे चित्त्यांना जमेल का, हा प्रश्न आहे. निरीक्षणानंतर चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात येणार आहे.