नवी दिल्ली – यंदाच्या वर्षातील पहिल्याच विदेश दौ-यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ायदेशी परतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांचा युरोप दौरा पूर्ण झाला आहे.
या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा केली. यामध्ये त्यांनी संरक्षण, अंतराळ, नागरी आण्विक सहकार्य तसेच द्विपक्षीय संबंध या मुद्द्यांवर चर्चा केली.
रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाल्याचे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सच्या नेतृत्वासोबत अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. तसेच तिन्ही देशातील भारतीयांशी संवाद देखील साधला. आपल्या दौऱ्यात पंतप्रधानांनी जर्मनी आणि डेन्मार्कमधील व्यावसायिकांशी संवाद साधला.