अमरावती : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम उच्च दर्जाचे करण्यात यावे. प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण जीवनाच्या कणा आहे. यामुळे या इमारतीचे बांधकाम नियोजनबद्ध व सर्व सोयींनी युक्त असावे. तसेच पुढील काळात येथील पाणंद रस्ताचे काम लवकरच पूर्ण करणार,असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर यांनी दिले.
विचोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे निर्लेखन करुन नवीन इमारत बांधकामचे भूमीपूजन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दत्ताभाऊ ढोमणे, सरपंच मंगला लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, तहसिलदार सागर ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जयस्वाल, रमेश काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कामाची अंदाजे किंमत साडेचार कोटी रुपये एवढी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व विस्तारीकरणांतर्गत हे विकास काम करण्यात येणार आहे. अडगाव बु. येथील आयुवेर्दिक दवाखान्याच्या नवीन इमारतीचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. या कामाची अंदाजे किंमत 62.95 लक्ष एवढी आहे. उपकेंद्राची बांधकामे व विस्तारीकरण या अंतर्गत हे विकास काम करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याचे मंत्री ठाकूर यांनी यावेळी सांगितले.