कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावाने विधवा प्रथेला मुठमाती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे अनुकरण अनेक गावांमध्ये केले जात आहे. शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या बसर्गे गावामध्येही त्यांच्या अंत्यसंस्कारापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रशांत जाधव यांच्या पत्नी पद्मा यांचे कुंकू कायम ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, लडाखमधील तुर्तक सेक्टरमध्ये खासगी बसला अपघात झाला होता. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुकमधील प्रशांत शिवाजी जाधव यांना वीरमरण आले. प्रशांत जाधव यांच्या पार्थिवावर आज (रविवारी दि. 29) त्यांच्या मुळ गावी बसर्गेमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते. अत्यंत शोकाकूल वातावरणात वीर जवानाला अंतिम निरोप देण्यात आला.
अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या अलोट जनसागराने पुष्पवृष्टी करत जाधव यांच्या पार्थिवाला अखेरची मानवंदना दिली. शहीद जवानाच्या पश्चात पत्नी पद्मा, अवघ्या 11 महिन्यांची कन्या नियती, वडिल शिवाजी आणि आई रेणुका असा परिवार आहे. प्रशांत आठ वर्षांपूर्वीच म्हणजेच 2014 मध्ये बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले होते. त्यांचा पद्मा यांच्याशी 2020 मध्ये विवाह झाला होता.
बसचा ताबा सुटल्याने नदीत कोसळली
अपघातग्रस्त बसमधून 26 जवान दहशतवाद्यांना चकवा देण्यासाठी खासगी बसने प्रवास करत असतानाच थोईसेपासून 25 किमी अंतरावर बसचा ताबा सुटला. त्यानंतर बस थेट नदीत कोसळली. या दुर्घटनेत जवान प्रशांत जाधव शहीद झाले.