नवी दिल्ली –तालिबान दहशतवादी अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या अगदी जवळ आले आहेत. त्याचवेळी शांतता चर्चा समिती नवा मसूदा तयार करत आहे. अफगाणिस्तानमधील विविध प्रांतामध्ये सुरु असलेल्या चकमकी थांबवणे आणि तालिबानशी तात्काळ युद्धविराम करण्याच्या उद्देशाने अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी राजीनामा देण्याची शक्यता आहे.
घनी राजधानी काबूलचं संरक्षण व्हावं यासाठी बुधवारी मजार-ए-शरीफमध्ये गेले होते. त्यावेळी सरकारशी संबंधित मिलिशिया कमांडरांसोबत त्यांची बैठक झाली. तालिबानच्या फौजांनी राजधानी काबूलला विळखा घातला आहे. तालिबानींनी काबूलचे प्रवेशद्वारे म्हटले जाणारे मैदान शहरही ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींच्या भाषणाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते. याशिवाय तालिबानचे वाढते वर्चस्व लक्षात घेता अमेरिकी दूतावास रिकामा करण्यास मदत करण्यासाठी अमेरिकन मरीन बटालीयनची 3000 सैन्यांची तुकडी शुक्रवारी अफगाणिस्तानात दाखल झाली आहे.
याव्यतिरिक्त तालिबानने आज पहाटे काबूलच्या दक्षिणेला असलेल्या लागूर प्रांतावर कब्जा केला. तसंच देशाच्या उत्तरेला असलेल्या मजार-ए-शरीफ शहरावर चारही बाजूंनी हल्ले सुरू केले आहेत.
राष्ट्रपती यांच्या भाषणातील काही भाग
अफगाण सुरक्षा दलाला पुन्हा एकत्र संघटीत करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यांनी पुढे म्हटले की, राष्ट्रपती म्हणून अस्थिरता, हिंसा आणि विस्थापनला रोखण्यासाठी प्रयत्न देण्यात येणार आहे.
अफगाणिस्तानने २० वर्षात ज्या गोष्टी साध्य केल्या आहेत. त्यांना गमावणार नाही. सार्वजनिक संपत्तीची नासधूस होऊ देणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जागतिक पातळीवर आणि देशांतर्गत पातळीवर मोठ्या प्रमाणावर सल्लामसलत, चर्चा करण्यात येत आहे.
या चर्चेतून ज्या गोष्टी समोर येतील, त्याबाबत अफगाणिस्तानच्या नागरिकांना सांगण्यात येईल असेही त्यांनी म्हंटले आहे.