अहमदनगर – जंगलक्षेत्र कमी झाल्यामुळे वन्यप्राणी आता मानवी वस्तीत शिरकाव करत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बिबट्या मानवी वस्तीत शिरल्याच्या नियमीत घटना घडतात. अनेकदा बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांना लक्ष्य केलं जातं. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एका शेतकऱ्यांने बकऱ्यांना लक्ष्य करणाऱ्या बिबट्यालाच खोलीत डांबल्याची करामत केली. या शेतकऱ्यांचं संपूर्ण पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
शेतकऱ्याने जीवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने बिबट्याला शेळ्यांच्या खोलीत कोंडल्याची घटना संगमनेर तालुक्यातील वनकुटे गावात घडली. प्रकाश रेवजी हांडे असं या धाडसी शेतकर्याचं नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शेतकरी प्रकाश रेवजी हांडे वनकुटे गावाअंतर्गत असलेल्या कळमजाई वस्तीत राहतात. त्यांचा शेळीपालनाचा व्यवसाय असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेळ्या आहेत. शुक्रवारी (13 ऑगस्ट) सायंकाळी नेहमीप्रमाणे हांडे यांनी आपल्या सर्व बकऱांना एका खोलीत कोंडून बाहेरून दरवाज्याला कुलूप लावले. मात्र, मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्याने दाराला धडक देत खोलीत प्रवेश केला.
यावेळी बकऱ्यांच्या आवाजाने हांडेंना जाग आली. त्यांनी खोलीत प्रवेश करताच त्यांना समोर बिबट्या दिसला. हांडेंना पाहताच बिबट्याने त्यांच्यावर झडप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र हांडे कसेबसे खोलीतून बाहेर पडले. मात्र त्याचवेळी त्यांनी खोलीचा दरवाजा बाहेरून लावत बिबट्याला मोठ्या हिंमतीने खोलींत डांबलं.
VIDEO: संगमनेरमधील वनकुटे येथे बिबट्याकडून 8 बकऱ्यांचा फडशा, 3 जखमी, शेतकऱ्यानं जीवाची पर्वा न करता बिबट्याला थेट खोलीत डांबला!#Leopard #Vankute #Sangamner #Ahmednagar #बिबट्या #संगमनेर pic.twitter.com/DsKK7AZZ00
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू 🇮🇳✊ (@PravinSindhu) August 14, 2021
दरम्यान या संदर्भात वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी रामदास थेटे, वनरक्षक सुजाता टेंबरे, दिलीप बहिरट, बाळासाहेब वैराळ, आंथा काळे हे सर्व जण घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी खोली जवळ पिंजरा लावला. जवळपास तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.