प्रदीप वळसे पाटील ः पारगाव येथे कार्यशाळेत आवाहन
पारगाव शिंगवे -विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातच स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी साठी आवश्यक सर्व सुविधा महाविद्यालय पुरवेल. अभ्यासिकेची सोय, स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणि वेळोवेळी तज्ञ व्याख्यात्यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले जाईल, उत्तम नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील यांनी केले.
पारगाव येथील भीमाशंकर शिक्षण संस्था संचालित दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय आणि युनिक ऍकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच “स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी’ कार्यशाळा पार पडली. यावेळी प्रदीप वळसे-पाटील बोलत होते. यावेळी युनिक ऍकॅडमीचे प्रा. दिनेश ताठे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी व दिगंबर इंगळे यांनी स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके, प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका याविषयी मार्गदर्शन केले.
भीमाशंकर शिक्षण संस्थेचे ओएसडी बी. डी. चव्हाण म्हणाले, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मदत, सुविधा लागतील त्या सर्व पुरवण्यात येतील. शिक्षण संस्थेचे संस्थापक व राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात. प्राचार्य डॉ. संभाजी शिंदे म्हणाले, भविष्यात बेकारीला तोंड द्यावे लागू नये, म्हणून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण काळातच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी.
विद्यार्थ्यांनी सातत्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा. त्यासाठी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विभाग कार्यरत आहे. स्पर्धा परीक्षेची विविध पुस्तके ही महाविद्यालय ग्रंथालयात उपलब्ध असून मागणीनुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जातील. कार्यक्रमाचे नियोजन एनसीआरडीच्या सदस्या रोहिणी वळसे पाटील यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा विभाग समितीने हातभार लावला. या कार्यशाळेस सुमारे 350 विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शाकूराव कोरडे व दत्तात्रय चव्हाण यांनी केले तर राहुल डोळस यांनी आभार मानले.