शिक्रापूर-येथील वेळ नदीमध्ये 12 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेल्या चौदा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज दुपारच्या सुमारास नदीच्या पाण्यावर त्याचा मृतदेह तरंगत असताना मिळून आला आहे.
अमर राधाकिशन तायडे (वय 14, रा. एल अँड टी फाटा, शिक्रापूर) असे या मुलाचे नाव आहे. वेळ नदीवरील बंधाऱ्यावर अमर तायडे व प्रताप नावाचा मुलगा पोहण्यासाठी आले होते. अमर हा पाण्यात बुडाला, तो पाण्यातून वर येत नसल्याने शिक्रापूरचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे व नागरिकांनी नदीच्या पाण्यात उतरून आमचा शोध घेतला; परंतु सोमवारी सायंकाळपर्यंत अमरचा शोध लागला नाही. आज देखील काही स्थानिक नागरिक व अमरचे नातेवाईक अमरचा पाण्यात शोध घेत होते. दरम्यान अमरचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे आढळून आले. उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे, सहायक उपनिरीक्षक महेंद्र शिंदे आदींनी त्याठिकाणी धाव घेत नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. याबाबत अमरचे चुलते लखन उत्तम तायडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.