पिंपरी – संत तुकोबारायांच्या दर्शनासाठी भंडारा डोंगर येथे छत्रपती शिवाजी महाराज आले होते. या श्रद्धास्थानाचे पावित्र्य कायम राहिले पाहिजे. विकासकामे करताना वारकऱ्यांच्या श्रद्धेला ठेच लागू देणार नाही. त्यामुळेच रिंगरोडच्या मार्गातही बदल करण्यात आला. श्रद्धा आणि तळमळ असल्यास अशी कामे उभी राहतात. श्री क्षेत्र भंडारा डोंगर परिसराचा चांगला विकास आराखडा तयार करा, त्यासाठी शासनाचे सर्व सहकार्य राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडारा डोंगर येथील माघ दशमी सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय शिरसाठ, भरत गोगावले, माजी मंत्री बाळा भेगडे, मंदिर समितीचे अध्यक्ष ह.भ.प.बाळासाहेब काशिद पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे. वारकरी संप्रदायाच्या रुपाने समाजाला दिशा देणारी मोठी शक्ती महाराष्ट्रात आहे. आपले सण, उत्सव, परंपरा पुढे नेण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने केले आहे. ही परंपरा आपणही पुढे न्यायला हवी. वारकरी संप्रदायाने समाजप्रबोधनाचे महत्वाचे कार्य सातत्याने केले आहे. आध्यात्मिक विचाराने जीवन सफल होतं. आध्यात्मिक सोहळ्यातून अनेकांच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडून जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न होत असते. उभारण्यात येणाऱ्या भव्य मंदिरापासून भक्ती, श्रद्धा, मांगल्याची भावना आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी श्री संत तुकाराम महाराज मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. तसेच संत तुकाराम महाराजांच्या मंदिर उभारणीच्या कामाची पाहणी केली. भव्य मंदिर उभारणीसाठी वारकरी दत्तात्रेय कराळे यांनी पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला