पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना करोना लस
पुणे – करोनावर लस उपलब्ध झाल्यानंतर त्याचे वितरण कसे करायचे, याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. लस आल्यानंतर पहिले प्राधान्य हे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना असेल. जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांची संख्या 12,400 इतकी आहे. येथील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची नाव व पत्ता आदींची माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे.
करोना रोखण्यासाठी लसींच्या चाचण्या घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने लस वितरणाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना मागील महिन्यात दिल्या होत्या.
डॉक्टर, नर्स, आरोग्य अधिकारी, रुग्णालयातील औषध विक्रेते, रुग्णालयातील सर्व प्रकारचे कर्मचारी आदींची माहिती नोंदवण्याचे काम सुरू आहे.
ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी रुग्णालयात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांची माहिती जमा करत आहे. ही सर्व एकत्रित माहिती पुढील आठवड्यात उपलब्ध होणार आहे.