पेठ (वार्ताहर) – भारतीय समाज माध्यमांमध्ये सध्या कोरोना लस विशेष करून कोविशिल्ड लस घेतलेल्यांमध्ये हृदयविकाराचे झटका येऊ शकतो किंवा ब्रेन हॅमरेज किंवा रक्ताच्या गाठी तयार होण्याची चर्चा जोरदारपणे सुरू आहे. त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले आहे.
आयसीएमआरच्या माजी शास्त्रज्ञांनी कोविशिल्ड लशीपासून भारतात धोका खूपच कमी आहे. त्यामुळे भारतीयांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे स्पष्ट केले आहे.
कोविशिल्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अॅस्ट्राझेनेकाने ब्रिटनच्या (युके) उच्च न्यायालयामध्ये मानवी शरीरावर लशीच्या दुष्परिणाम होऊ शकतात याची माहिती दिल्यामुळे भारतात आणि जगभरात याची जोरदार चर्चा सुरू झाली. सध्या भारतात लोकसभा निवडणुका चालू आहेत.
नेमक्या याच वेळेस लशीच्या दुष्परिणामाची चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळे राजकीय आरोप आणि प्रत्यारोपानेही जोर धरला आहे. करोना महामारीच्या काळामध्ये ही करोना लस जगभरात विविध नावाने विकली गेलेली आहे. त्यामुळे भारताबरोबरच जगभरात सुद्धा ही चर्चा चालू आहे.
आधुनिक जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. पण कोविशिल्ड लशीचा आणि हृदयविकाराचा तसा काही थेट संबंध वाटत नाही. उलट करोना काळात कोविशिल्ड लसीमुळे अनेकांचे जीव वाचलेले आहे. अनेकांमध्ये या लसीमुळे रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे तयार झाली. नियमित व्यायाम, सकारात्मक विचार,योगाभ्यास या गोष्टींचा नागरिकांनी अवलंब करावा. -डॉ. अमोल बेनके, मेडिकल डायरेक्टर, युनिकेअर हॉस्पिटल चाकण
करोना काळामध्ये ९० टक्के लोकांना कोविशिल्ड हीच लस दिली गेली आहे. लशीमुळे अनेकांना प्रतिकारशक्ती चांगली आलेली आहे. त्यामुळे करोना काळात अनेक जणांचे जीव वाचवण्याचे काम या लशीमुळे झाले आहे. मी स्वतः ही लस घेतली असल्यामुळे मला करोना होऊन ही कोणताही त्रास झाला नाही. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. -अशोक मैंदाड, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, राजगुरुनगर
कोविशिल्डच्या दोन लशी आणि एक बुस्टर डोस घेतलेला आहे. त्यामुळे करोना काळात मला कोणताही त्रास झाला नाही. सध्या वय ७० वर्षे आहे. रोज पाच किलोमीटर नित्यनेमाने चालतो. लसीकरणाचा शरीरावर कोणताही परिणाम जाणवत नाही. -मुरलीधर विठोबा धुमाळ, ज्येष्ठ नागरिक पेठ